सामाजिक
Trending

संजय कोडगे : सत्तेपेक्षा संघटन मोठं मानणारा किंगमेकर.

भाजपा नांदेड महानगर जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ऍड. दिलीप ठाकूर.

दैनिक झुंजार टाईम्स

राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी 

दिनांक :- ०४-०१-२०२६

मराठवाडा हा राजकीयदृष्ट्या नेहमीच आव्हानात्मक प्रदेश मानला जातो. विविध विचारधारांचा संघर्ष, गुंतागुंतीची सामाजिक समीकरणे आणि सतत बदलणारी राजकीय स्थिती—या साऱ्यांत एखाद्या पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या बळकट करणे हे अत्यंत कठीण काम. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जनता पक्ष मराठवाड्यात खोलवर रुजावा, कार्यकर्ता केंद्रस्थानी यावा आणि संघटनाची पायाभरणी भक्कम व्हावी, यासाठी जे अहोरात्र झटत राहिले—त्यात अग्रस्थानी नाव येते ते संजय कोडगे यांचे.

मराठवाडा संघटन मंत्री म्हणून गेली १४ वर्षे कार्यरत असलेले संजय कोडगे हे मूळचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत सक्रिय सहभाग घेत त्यांनी संघशिस्त, राष्ट्रनिष्ठा आणि कार्यकर्ताकेंद्रित विचार आत्मसात केला. त्यांच्या नेतृत्व क्षमतेची खरी ओळख कॉलेज जीवनातच झाली. त्या काळात सर्वत्र युवक काँग्रेसचा प्रभाव असताना, मुठभर सहकाऱ्यांना सोबत घेऊन विद्यार्थी चळवळीत ठामपणे उभे राहणारे संजयभाऊ—विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल तर निर्भीडपणे समोर जाणारे, स्पष्ट बोलणारे आणि संघर्षाला न घाबरणारे युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले.

कोणताही राजकीय वारसा नसताना, सामान्य कुटुंबातून आलेल्या संजयभाऊंनी कष्ट, प्रामाणिकपणा आणि संघटन कौशल्य यांच्या बळावर भाजपमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. कुटुंबात सर्वांत लहान भाऊ असूनही त्यांनी सर्व भावांना व त्यांच्या परिवारांना नेहमीच योग्य तो मान-सन्मान दिला. त्यामुळे वयाने लहान असूनही त्यांच्या शब्दाला आज कुटुंबप्रमुखासारखे महत्त्व दिले जाते—ही बाब त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेची साक्ष देते.

मराठवाडा संघटन मंत्री म्हणून काम करताना त्यांनी एक ठाम धोरण स्वीकारले—सामान्य कार्यकर्त्याला मोठे करायचे. या भूमिकेतून ते प्रसंगी आमदार, खासदार किंवा मंत्र्यांनाही स्पष्ट शब्दांत भूमिका मांडण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. कुणाची चूक झाली तर ती लगेच दाखवून देण्याची त्यांची पद्धत आहे; मात्र त्यामागे कुणाला दुखवण्याचा हेतू नसतो—चूक पुन्हा होऊ नये, संघटन सुदृढ राहावे, हा प्रामाणिक उद्देश असतो.

मराठवाडाभर त्यांच्या पायाला जणू भिंगरी लागल्यासारखी सतत भ्रमंती सुरू असते. महिन्याभराचे नियोजन आधीच आखलेले असल्यामुळे एखादाही दिवस रिकामा जात नाही. कधी छ. संभाजीनगर, कधी बीड, कधी लातूर, तर कधी धाराशिव—असा त्यांचा प्रवास अखंड सुरू असतो. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ता, मंडळ, तालुका आणि जिल्हा संघटनाशी ते थेट संवाद साधतात; ऐकून घेतात, समजून घेतात आणि मार्ग काढतात—हीच त्यांच्या कामाची खासियत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा प्रत्येक कार्यकर्त्याला असते. मात्र संजयभाऊंनी या बाबतीतही एक वेगळी, कार्यकर्ताकेंद्रित परंपरा निर्माण केली. मोदी एखाद्या जिल्ह्यात आले की, प्रत्येकवेळी नवीन व सामान्य पन्नास कार्यकर्त्यांना भेटण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली; तो क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरला—आणि संघटनाशी नातं अधिक घट्ट झालं.

भाजपच्या उच्चस्तरीय नेत्यांपर्यंत संजय कोडगे यांची ओळख असली, तरी त्या ओळखीचा उपयोग स्वतःसाठी तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी कधीच केला नाही. उलट, एखादा योग्य, कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता असूनही त्याला पाठबळ नसेल, तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून नवीन नेतृत्व घडवण्याची दृष्टी त्यांनी कायम जपली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक कार्यकर्ते आज आमदार, खासदार आणि मंत्रीपदापर्यंत पोहोचले आहेत. आजही हे नेते संजयभाऊंना भेटले की आदराने, विनम्रतेने अभिवादन करतात—हीच त्यांच्या कार्याची खरी पावती.

“शिस्त असावी, पण अवास्तव स्तोम नसावा”—हा त्यांचा शिरस्ता. त्यामुळे मराठवाड्यात भाजपमध्ये शिस्तीचे, पण आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे. एखाद्या कार्यकर्त्याला आमदार, खासदार किंवा जिल्हाध्यक्षांविषयी तक्रार मांडायची असेल, तर त्याला हक्काची व्यक्ती वाटते ती म्हणजे संजयभाऊ. कार्यकर्त्याची अडचण नीट समजून घेणे आणि तोडगा काढल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत.

पडद्यामागे राहून काम करणारा, पण संघटनाची प्रत्येक नाडी ओळखणारा हा किंगमेकर म्हणजेच संजय कोडगे. मराठवाड्यात भाजपची मुळे अधिक घट्ट करण्यामागे त्यांच्या अथक परिश्रमांचा, शिस्तबद्ध दृष्टीकोनाचा आणि कार्यकर्त्यांवरील विश्वासाचा मोठा वाटा आहे—हे नाकारून चालणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button