कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणूक : प्रभाग क्र. १२अ मधून आरती प्रथमेश पवार यांची उमेदवारी जाहीर.

दैनिक झुंजार टाईम्स
आनंदा धेंडे:- कल्याण प्रतिनिधी
दिनांक:- ३०-१२-२०२५
ठाणे:- कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्र. १२अ मधून शिवसेना (ठाकरे गट) कडून आरती प्रथमेश पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. समाजसेवेची भक्कम पार्श्वभूमी आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असलेल्या पवार यांची उमेदवारी नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
अल्प परिचय
आरती पवार यांचा जन्म सिद्धार्थ नगर, कल्याण पूर्व येथे झाला असून, त्या जन्मापासून कल्याणच्या रहिवासी आहेत. समाजसेवेचा वारसा त्यांना पिढ्यान्पिढ्या लाभलेला असून त्यांचे आजोबा, वडील तसेच संपूर्ण कुटुंब सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय राहिले आहे.
त्यांचे माहेर सिद्धार्थ नगर येथे असून विवाहानंतर त्या आनंदवाडी येथे स्थायिक झाल्या आहेत. त्यांचे पती प्रथमेश सुनील पवार हेही समाजसेवेत सक्रिय असून आनंदवाडी, सिद्धार्थ नगर, लक्ष्मीबाग व गणेशवाडी हा संपूर्ण परिसर प्रभाग क्र. १२अ अंतर्गत येतो. या परिसराशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
आरती पवार यांच्या कुटुंबाने केलेले समाजोपयोगी कार्य विशेष उल्लेखनीय आहे. त्यांचे वडील दीपक जाधव यांनी मुरबाड तालुक्यातील शिवले गावातील वडिलोपार्जित एक एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई यांच्या स्मारकासाठी महाराष्ट्र शासनाला दान केली आहे. या कार्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे कुटुंबाचा सन्मान केला होता.
प्रभागातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी गटार व नाल्यांची दुरुस्ती व स्वच्छता यासाठी पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आरोग्य, शिक्षण व सामाजिक उपक्रमांवर त्यांचा विशेष भर राहिला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मदत, लहान मुलांसाठी शैक्षणिक सहकार्य, महिलांसाठी मार्गदर्शन आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पतींनी अनेक उपक्रम राबवले आहेत.
“प्रभागातील प्रत्येक समस्या ही माझी स्वतःची समस्या आहे. प्रामाणिक सेवा आणि विकास हाच माझा ध्यास आहे,” असे आरती प्रथमेश पवार यांनी सांगितले. प्रभाग क्र. १२अ च्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा हीच आपली खरी ताकद असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.




