जांभिवली-चौकचा सुपुत्र कु. पार्थ माया गावडे यांची NDA मध्ये निवड!
गावात अभिमान व आनंदाचे वातावरण.

दैनिक झुंजार टाईम्स
(चौक) | प्रतिनिधी : बालाराम सावंत
दिनांक:- २८-१२-२०२५
खालापूर:- जांभिवली-चौक या ग्रामीण भागातून देशसेवेच्या सर्वोच्च शिखराकडे झेप घेणारा सुपुत्र मिळाल्याने आज संपूर्ण गावाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. येथील कु. पार्थ माया गावडे यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये निवड झाली असून ते NDA-155 बॅच अंतर्गत भारतीय सैन्यात (लेफ्टनंट) म्हणून भावी अधिकारी घडण्यासाठी प्रशिक्षणास दाखल होणार आहेत. या यशामुळे जांभिवली-चौकसह संपूर्ण परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण पसरले आहे.
साध्या ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या पार्थ यांनी कठोर परिश्रम, अपार चिकाटी, शिस्त आणि देशप्रेमाच्या भावनेतून हे स्वप्न साकार केले आहे. अनेक अडचणी, अपयश आणि संघर्षांना सामोरे जात त्यांनी कधीही हार मानली नाही. आज त्यांच्या यशाने गावातील प्रत्येक घरात आनंदाश्रू तर तरुणांच्या डोळ्यांत नवी स्वप्ने दिसत आहेत.
या यशामागे कु. पार्थ यांचे आई-वडील माया हनुमंत गावडे व स्वाती माया गावडे यांचे संस्कार, पाठबळ व त्याग आहे. तसेच कु. कौस्तुभ माया गावडे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने दिलेल्या मानसिक आधारामुळेच पार्थ यांची वाटचाल बळकट झाली, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
कु. पार्थ यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल चौक विभाग व ग्रामस्थ मंडळ, जांभिवली यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, “आमच्या गावचा मुलगा आता देशाच्या संरक्षणाची धुरा सांभाळणार” या भावनेने प्रत्येक ग्रामस्थ भारावून गेला आहे.
देशसेवेच्या या पवित्र मार्गावर कु. पार्थ माया गावडे यांची वाटचाल यशस्वी, शौर्यपूर्ण व प्रेरणादायी ठरो, अशी सदिच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.




