
दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे | वार्ताहर
दिनांक १९-१२-२०२५
मुंबई :- इंदूमिल स्मारकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य आणि प्रेरणादायी पुतळा आपल्या कुशल हस्तकलेतून साकार करणारे ज्येष्ठ शिल्पकार, महाराष्ट्र भूषण व पद्मश्री राम सुतार यांचे आज वयाच्या १००व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाने शिल्पकलेतील एक युगप्रवर्तक कलाकार गमावला आहे.
शब्दांत न मावणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उंची, त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज, तसेच विचारांची अपार ताकद राम सुतार यांनी आपल्या शिल्पकलेतून अजरामर केली. उद्या बाबासाहेबांचे लाखो अनुयायी इंदूमिल येथील पुतळ्याकडे अभिमानाने पाहतील, तेव्हा त्या प्रत्येक नजरेत राम सुतार यांच्या महान शिल्पकलेचे ऋण दडलेले असेल.
राम सुतार यांचा जन्म १९२५ साली धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत पाच खंडांमध्ये २०० हून अधिक शिल्पांची निर्मिती करत आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’—सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८० मीटर उंच, जगातील सर्वात उंच पुतळा—ही त्यांची अजरामर कलाकृती मानली जाते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदूमिल स्मारकातील भव्य पुतळा हे राम सुतार यांच्या जीवनातील शेवटचे महत्त्वपूर्ण शिल्प ठरले. त्यांच्या जाण्याने शिल्पकलेचा एक दीप विझला असला, तरी त्यांनी घडवलेली शिल्पे पिढ्यान्पिढ्या प्रेरणा देत राहतील.




