लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ भीषण स्फोट — ८ ठार, २० पेक्षा अधिक जखमी.

दैनिक झुंजार टाईम्स
वार्ताहर — महेंद्र माघाडे
दिनांक:- ११-११-२०२५
दिल्ली : लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ,१०नोव्हेंबर सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जखमी झाले आहेत. सुमारे २०० मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा परिणाम जाणवला. परिसरात एकच गोंधळ उडाला.
प्राथमिक तपासानुसार हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या वेळी हा स्फोट झाला, त्या ठिकाणी काही नागरिक उपस्थित होते, मात्र त्याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. स्फोटानंतर घटनास्थळी कुठल्याही प्रकारचा खड्डा तयार झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच काही मृत किंवा गंभीर जखमी व्यक्तींना छिद्रे किंवा हल्ल्याचे ठसे लागले नाहीत, ज्यामुळे या स्फोटाचे स्वरूप गूढ मानले जात आहे.
दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. परिसर सील करून बॉम्ब तपास पथक, फॉरेन्सिक आणि एटीएसचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “अचानक भीषण आवाज झाला आणि लोकांची पळापळ सुरू झाली.”
दरम्यान, तपास यंत्रणांनी प्राथमिक स्वरूपात हा स्फोट दहशतवादी हल्ला नसल्याची शक्यता देखील नाकारलेली नाही. मात्र, घटनास्थळी स्फोटकाचे ठोस पुरावे आढळले नसल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, “हा स्फोट आतापर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षा भिन्न आहे. स्फोटकाचे तुकडे, लोखंडाचे तुकडे किंवा वायरिंगचे अवशेष आढळले नाहीत.”
एटीएस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपास यंत्रणा सध्या सर्व शक्यतांवर विचार करत असून, सुरक्षा यंत्रणांकडून परिसरात उच्चस्तरीय तपास सुरू आहे.
🔹 घटनास्थळी बचाव कार्य सुरू
🔹 फॉरेन्सिक तपासासाठी नमुने गोळा
🔹 आतापर्यंत ८ मृत, २० जखमी
🔹 स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट.




