
दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे – वार्ताहर
दिनांक:- ०७-११-२०२५
मुंबई:- डाॅ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद बोलावुण केलेल्या असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडी, मुंबई तर्फे गुरुवारी दिनांक ६ नोव्हेंबर रोजी दुपारी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मुंबई कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मोर्चा सुरू होताच परिस्थिती ताणतणावाची बनली. राज्य सरकारने मोर्चा पांगवण्यासाठी पोलिस बळ तैनात केले. यावेळी पोलिसांनी महिला आंदोलकांना जोर जबरीने अडवण्याचा प्रयत्न करत मारहाण व जोरदार ढकला ढकली केल्याचे निषेध मोर्चातील महिलांनी सांगितले.
या कारवाईत अनेक महिलांचे कपडे फाटले असून मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष:- स्नेहल सोहनी यांना हाताला दुखापत झाली आहे. काही महिला पदाधिका-यांना जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी अमानुष वागणूक दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
या धक्काबुक्कीत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या उत्कर्षाताई रूपवते, तसेच मुंबई महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी यांसह इतर पदाधिकारी जखमी झाल्या आहेत.
वंचित बहुजन महिला आघाडीने यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे निवेदन देऊन, सातत्याने महिलांबाबत असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना तात्काळ पदावरून हटवावे, अशी मागणी केली होती.
राज्य सरकारच्या या दडपशाहीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई आणि जखमी महिलांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.




