विद्यावर्धिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातुर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- २७-०८-२०२५
अहमदपूर ता. २६ : विद्यार्थ्यांना बाल वयातच पर्यावरणपुरक उत्सवाचे महत्व समजावे, पर्यावरण टिकवण्याचे भान यावे यासाठी विद्यावर्धिनी विद्यालय येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालकही रमले. विशेष म्हणजे, स्वतः साकारलेली गणेश मूर्ती स्वतःच्या घरात विराजमान होणार आहे, याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
मागील काही वर्षापासून विद्यावर्धिनी विद्यालया मध्ये पर्यावरणपूरक गणपती मुर्ती बनवण्याची कार्यशाळा घेतली जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी यात सहभागी होतात. यावर्षीची मुर्ती तयार करण्याची कार्यशाळा 26 ऑगस्ट या दिवसी घेण्यात आली. या कार्यशाळेत पल्लवी बेल्लाळे यांनी लाल मातीपासून गणपती बनवण्याचे प्रशिक्षण पालक आणि विद्यार्थ्यांना दिले. पालकांसह लहान मुलेही वेगवेगळ्या दोन गटात उत्साहाने सहभागी झाले.
जवळपास ७० गणपती मुर्ती तयार झाल्या. लाल मातीपासून तयार हीच मुर्ती आता घराघरात स्थापन केली जाणार आहे. स्वतःच्या हाताने बनवलेल्या ‘श्रीं’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना स्वतःच्या घरात करण्याचा आनंद कार्यशाळेत दिसत होता. कार्यशाळेत मुलांसोबत आईचा विशेष सहभाग यात होता. त्यांच्यामधील मूर्ती बनवत असतानाचा होणारा संवाद, एकमेकांशी सहकार्य यातून एकापेक्षा एक सुबक, सुंदर आणि विलोभनीय अशा गणेश मूर्ती तयार झाल्या आहेत.
रोटरी क्लबच्या सौजन्याने सहभागी झालेल्या माता पालकांना प्रथम,द्वितीय क्रमांक काढून प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. रो.धिरेंद्र ढेले रो. गोपाळ पटेल यांनी उपस्थित राहून पालकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील साहेब शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक , पालक ,विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.




