पुण्यातील ७९ मिनिटांची विक्रमी स्केटिंग मॅरेथॉन! वर्षांचा शिवांश शिवाजी खिलारे ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

दैनिक झुंजार टाईम्स
प्रतिनिधी पुणे
दिनांक:- १६-०८-२०२५
७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पॅन्थर रोलर स्केटिंग अकॅडमी पुणे यांच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. देशभक्तीची जागृती व क्रांतिवीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पुण्यातील विद्यार्थ्यांनी तब्बल ७९ मिनिटांची नॉन-स्टॉप स्केटिंग मॅरेथॉन पूर्ण केली.
या मॅरेथॉनमध्ये पुण्यातील अंदाजे ३५ ते ४५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. मात्र, सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते केवळ वय वर्ष अवघे पाच असलेल्या शनिवार पेठेतील न्यायमूर्ती रानडे बालक शाळेचा विद्यार्थी शिवांश शिवाजी खिलारे याने. एवढ्या लहान वयात त्याने सातत्य, चिकाटी आणि उत्साह दाखवत पूर्ण ७९ मिनिटांची मॅरेथॉन स्केटिंग पूर्ण केली. त्यामुळे प्रेक्षक व आयोजकांनी त्याचे भरभरून कौतुक केले.
ही मॅरेथॉन फक्त पुण्यातच नव्हे तर भारतातील २२ शहरांमध्ये एकाचवेळी घेण्यात आली. एकूण ५७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून, या उपक्रमाची नोंद प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विक्रम संस्थांमध्ये झाली आहे.
या उपक्रमासाठी पॅन्थर स्केटिंग क्लब पुणेचे तनुजा देसाई व विशाल देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
देशभक्तीच्या साक्षीने आणि विक्रमाच्या शिखरावर पोहोचलेल्या या मॅरेथॉनमुळे पुणेकरांना आणि विशेषतः लहानग्या शिवांशिवाजीला मोठा अभिमान वाटला आहे. त्याच्या या पराक्रमामुळे तो अनेक मुलांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.