अश्वपरीस फाऊंडेशनच्या माध्यमातून मनोरुग्णांसाठी “अनोखे रक्षाबंधन”

दैनिक झुंजार टाईम्स
कैलासराजे घरत:- रायगड जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- ०९-०८-२०२५
“रक्षाबंधन हा केवळ भाव-बहिणींचा सण नसून, तो प्रेम, स्नेह, जिव्हाळा आणि विश्वासाचा धागा आहे.”
हाच सण यंदा अश्वपरीस फाऊंडेशन ने एक आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला — अशा भावंडांसोबत, ज्यांना समाज बहुतेक वेळा विसरतो… आपले मनोरुग्ण भाऊ-बहिणी.
जीवनाच्या वळणावर आपल्या कुटुंबापासून दूर गेलेले आणि अनेकदा सण-उत्सवाच्या आनंदापासून वंचित राहणारे हे बांधव, आज फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांसोबत आनंद, हशा आणि आपुलकीच्या वातावरणात रंगले. स्वतःच्या हस्ताने राख्या बांधून, त्यांना प्रेमाचा धागा आणि आपलेपणाची उब दिली गेली.
राखी बांधतानाचे त्यांचे चमकणारे डोळे, कधी ओलावलेले तर कधी हसरे चेहरे — या सर्व क्षणांनी वातावरण भावनांनी भारले. हा उपक्रम केवळ एका दिवसाचा सोहळा नसून, त्यांच्या मनात “आम्ही एकटे नाही” हा विश्वास पेरणारा ठरला.
अश्वपरीस फाऊंडेशन च्या या अनोख्या रक्षाबंधन उपक्रमाने पुन्हा एकदा दाखवून दिले की — प्रेम आणि आपुलकीच्या धाग्याने प्रत्येक मन जोडता येते, मग तो कोणताही असो.
या उपक्रमात अश्वपरीस फाऊंडेशन व मनचक्षू फाऊंडेशन चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.