नारळी पौर्णिमा; कोळी समाजाचा उत्साह, परंपरेचा सण.

दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- प्रतिनिधी- उलवे-नवीमुंबई
दिनांक:- ०८-०८-२०२५
किनारपट्टीवरील जीवन हे समुद्राशी नातं जपणारं. भरती-ओहटीच्या वेळा, हवामानातील बदल यावर साऱ्या कोळी बांधवांचं आयुष्य अवलंबून. पण श्रावणातली नारळी पौर्णिमा – हा सण मात्र त्यांच्यासाठी केवळ समुद्रात उतरण्याचा नव्हे, तर आनंद, नवचैतन्य आणि श्रद्धेचा मोठा पर्वणीचा दिवस असतो.
मान्सून काळात समुद्र कोपलेला असतो. ढगांच्या गडगडाटात, विजांच्या कडकडाटात समुद्रात वादळ उठतं. अशा वातावरणात मासेमारी थांबते. ही विश्रांती केवळ सुरक्षा नव्हे तर निसर्गचक्रातील एक आवश्यक टप्पा – माशांच्या प्रजननाचा काळ. यामुळे कोळी समाज आपसूकच मासेमारीपासून दूर राहतो.
पण श्रावण पौर्णिमा – म्हणजेच नारळी पौर्णिमा येते आणि समुद्र शांत होतो. आकाश निर्मळ होतं. कोळी बांधव आपली होडी सजवून समुद्राच्या पूजनासाठी उतरतात. नारळ अर्पण करून समुद्रदेवतेची प्रार्थना करतात – पुढचा प्रवास सुरक्षित होवो, भरघोस मासेमारी होवो.
घरी गोड नारळाचे पदार्थ बनतात. खास करून नारळीभाताचा घमघमाट घराघरात दरवळतो. कोळीवाड्यांमध्ये सणाचा उत्साह ओसंडून वाहतो. पारंपरिक वेशभूषा परिधान करून कोळी भगिनी समुंदराच्या किनाऱ्यावर एकत्र जमतात. पारंपरिक कोळीगीते आणि नृत्य सादर करत ही साजरी केली जाणारी नारळी पौर्णिमा ही केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक समृद्धीचं प्रतीक बनते.
कोळीगीते – जी पारंपरिक, ठेक्याने भारलेली आणि उत्स्फूर्त नृत्याला प्रवृत्त करणारी – यांचा आज जल्लोषात आस्वाद घेतला जातो. ही गीते कोळी समाजाच्या सांस्कृतिक ठेव्याचे द्योतक आहेत.
नारळी पौर्णिमा हा सण म्हणजे कोळी समाजासाठी केवळ होड्या समुद्रात उतरवण्याचा दिवस नव्हे, तर समुद्राशी असलेल्या आपुलकीच्या नात्याचा उत्सव आहे – श्रद्धा, निसर्ग, परंपरा आणि आनंद यांचं एकत्रित दर्शन.