गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही ?

दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे. उलवे-नवीमुंबई.प्रतिनिधी.
दिनांक:- ०६-०८-२०२५
मुंबई. राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी लागणाऱ्या प्रचंड निधीमुळे यंदा गणेशोत्सवात ‘आनंदाचा शिधा’ वाटप होणार नाही, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. त्यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी रुपये खर्च येणार असून, सध्याच्या आर्थिक स्थितीत आनंदाचा शिधा देणे शक्य नाही.
गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव व इतर सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांना केवळ १०० रुपयांत चार वस्तूंचा शिधा देण्याची योजना राबवली जात होती. मात्र, यंदा ही योजना आर्थिक मर्यादांमुळे थांबवावी लागत आहे.
छगन भुजबळ म्हणाले, “राज्याच्या तिजोरीतील मोठा हिस्सा ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी खर्च होतो आहे. त्यामुळे इतर योजनांवर परिणाम होत आहे. आम्ही उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या निधीची अडचण असली तरी भविष्यात निधी उपलब्ध होताच योजना पुन्हा सुरू केली जाईल.”
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, योजनेमुळे इतर सामाजिक उपक्रमांवरही आर्थिक ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे सणासुदीतील काही योजना थांबवाव्या लागत आहेत.