यावर्षी तरी मुंबई- गोवा महामार्गावर खड्डे मुक्त करून कोकणवासी गणेश भक्तांना गणपती बाप्पा पावणार का?

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक १९-०७-२०२५
गेली १८ वर्षे झाले मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याचे काम चालू आहे. तरीही अजूनही काम अपूर्ण आहे. या या रस्त्यावर दरवर्षी अनेक ठिकाणी अनेक वेळा अपघात घडतात.निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. कित्येक वर्षापासून अनेक राजकीय नेत्यांच्या या रस्त्याची पाहणी झालेली आहे पण अद्याप या रस्त्याचे काम अपूर्णच आहे.
पेन ते महाड या मार्गावर एकूण ३९ डेंजर झोन आहेत. गणपती बाप्पाच्या आगमन केवळ ४० दिवसावर येऊन ठेपले आहे. या महामार्गावरील खड्ड्यामुळेच कोकणवासीयांना आजपर्यंत गणेशोत्सवाला जाताना अशा बिकट परिस्थितीला सामना करावा लागत आहे. गोवा मार्गाच्या ९५ किलोमीटर अंतरावरील या ३९ डेंजर स्पॉटमध्ये चार अपूर्ण फुल, १२ सर्विस रोड आठ अंडरपास या महत्त्वाच्या कामाचा समावेश आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांना कामे पूर्ण करण्याचा कालावधी दिला आहे पण ही कामे पूर्ण होतील का ? याची शंका कंत्राटदार यांनी खाजगीत बोलताना दिसत आहे.
फक्त गणेशोत्सव, दिवाळी , होळी अशा प्रकारचे सण उत्सव आले की प्रशासनाला जाग येते व प्रशासकीय अधिकारी कामाला लागतात. केवळ ५ ते ६ तासात प्रवास करताना लागणारा वेळ आता ९ ते १० तास लागतो आहे.
महाराष्ट्रातील मोटर वाहन विभाग वाहनांच्या वर वाहन कर दर किमान १० टक्के व जास्तीत जास्त २० टक्के शुल्क आकारते व पंधरा वर्षानंतर वाहन कर भरून परत वापरण्याची परवानगी देते पण गेली १८ वर्षे महामार्गावर वाहन चालकांना कर भरून सुद्धा अशा बिकट रस्त्यामध्ये वाहने चालवावी लागत आहेत. याला जबाबदार कोण? जर रस्ता अपूर्णच आहे तर महाराष्ट्र शासन वाहन कर कसा काय घेते? याची खंत वाहन मालकांमध्ये दिसत आहे.
कोकणवासी यांची “रोज मरे त्याला कोण रडे” अशी अवस्था झाली आहे. गणेशोत्सवावेळी या महामार्गावर तासंतास वाहनांची गर्दी असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकणवासी गणेश भक्त आपल्या गावाकडे गणेशोत्सवासाठी जाण्याची वाट पाहत आहेत. महामार्गावरील या रस्त्यांची दुरावस्था पाहून गणेश भक्तांच्या मनात द्विधा अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे “गणपती बाप्पा यावर्षी तरी तुझ्या दर्शनाला सुखा समाधानाने येऊ दे” अशी अंतर्मनाणे गणेश भक्त हाक मारताना दिसत आहेत.