पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतत अवकाळी पाऊस, शेतकरी पेरणीच्या चिंतेत!
अवकाळी पावसाचा महाराष्ट्र राज्याला जोरदार तडाखा.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- २६-०५-२०२५
गेले पाच ते सात दिवस सलग अवकाळी पाऊस पडत आहे. सकाळी ऊन दुपारी पावसाच्या ढगाची निर्मिती व सायंकाळी चार वाजल्यापासून पाऊस हा दिनक्रम चालूच झाला आहे.
मे महिन्यातच अवकाळी पावसाने सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे नदी ,नाले ,छोटे ,तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी तर नद्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये मे महिन्यात शेतकरी पावसाच्या अगोदर शेतीची मशागत दरवर्षी करत असतो. दरवर्षी या महिन्यात पाऊस पडल्यावर थोडा विश्रांती देतो. त्यावेळेस शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यास वेळ भेटतो. याच कालावधीत ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी आपली पेरणी करत असतात व बाकीची पेरणी ही जून महिन्यात पाऊस चालू झाल्यानंतर होत असते पेरणी झाल्यामुळे शेतकरी समाधानी होत असतो. घाटमाथ्यावर अशाच प्रकारे पेरणी केली जाते व बागायती शेतीमध्ये पाऊस पडल्यानंतर पिकांची रोपे लावून लावणी केली जाते.
यावर्षी एक वेगळेच समीकरण पावसाने बदलले आहे. मे महिन्यात सततच्या अवकाळी पावसामुळे पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये पाच ते सात दिवसात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकरी पाऊस कधी उघडणार व पेरणीस कधी सुरुवात करणार याची चिंता शेतकऱ्याला वाटू लागली आहे.