सांगवी ग्रा.पं.मध्ये ७.७४ लाखांचा गैरव्यवहार !
काम न करता कागदोपत्री काम दाखवून निधीची उचल. ग्रामसेवक सरपंच व अभियंत्या विरुद्ध कारवाई करा ! अन्यथा बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा

झुंजार टाईम्स
पनवेल प्रतिनिधी:- कांतीलाल पाटील
सांगवी (घुगी), शिरूर अनंतपाळ : २८/०४/२०२५
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी (घुगी) या ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर झालेल्या विविध विकास कामांमध्ये मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. प्राप्त माहितीनुसार, ग्रामपंचायतीने बाला उपक्रम, अंगणवाडी किलबिल योजना आणि हॅन्ड वॉश स्टेशन अशा विविध कामांसाठी एकूण ७,७४,५२६ इतका निधी उचललेला असून, प्रत्यक्षात ही कामे करण्यात आलेली नाहीत.
तक्रारदार संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, सदर कामे झड लोकेशन व तारीख, वेळेनिशी फोटो यांच्या माध्यमातून तपासली असता कोणतीही प्रत्यक्ष कामे झालेले दिसून आले नाहीत. मात्र, खोट्या कागदपत्रांद्वारे बिले उचलून भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
कामांचा तपशील खालीलप्रमाणे आहे: बाला उपक्रमः १८,००० NB: १,२१,४२६ बाला उपक्रमः १,४४,४०० बाला उपक्रमः २६,९०० बाला हॅप्पी होम उपक्रमः ४१,६०० अंगणवाडी किलबिलः ६३,६०० जिल्हा परिषद शाळा हॅन्ड वॉश स्टेशनः ३५,८६० एकूणः ७,७४,५२६.
तक्रारदारांनी संबंधितांवर तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची, तसेच निलंबन व रकमेची वसुली करण्याची मागणी केली आहे. तसेच याप्रकरणात जर तात्काळ योग्य ती कारवाई झाली नाही, तर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी दिला आहे अशी माहिती माजी सरपंच सांगवी (घुगी) व्यंकटराव रामराव बिरादार यांनी दिली.