पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात पनवेलमधील दिलीप देसले मृत्युमुखी.
जम्मू काश्मीर येथिल पहलगाम मध्ये दहशतवाद्यांचा अंधाधुंद गोळीबार.

झुंजार टाईम्स
कांतीलाल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
कामोठेमधील माणिक व सुबोध पाटील पती पत्नी जखमी.
जम्मू काश्मीर येथील पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नविन पनवेल सेक्टर १२ येथील दिलीप देसले मृत्युमुखी झाले आहेत. तर कामोठे येथील सुबोध पाटील आणि माणिक पाटील हे पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना श्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक ठाक आहे. अमरनाथ यात्रेसाठी पनवेलमधून निसर्ग ट्रॅव्हल्स द्वारे ३९ पर्यटक रवाना झाले होते. २१ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान निसर्ग ट्रॅव्हल्स आयोजित अमरनाथ यात्रा निघाली होती. या यात्रेत पनवेल येथील ३९ पर्यटक सहभागी झाले होते. पर्यटकांना पहलगाम येथे गाठून मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्मविचारत गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात नविन पनवेल येथील दिलीप देसले हे गोळीबारात ठार झाले. तर कामोठेमधील माणिक पाटील आणि त्यांच्या पत्नी सुबोध पाटील या जखमी झाल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. माणिक पाटील हे कस्टममधून सेवावृत्त झालेले कर्मचारी आहेत. कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशिरापर्यंत त्या पाटील यांच्या कुटुंबीयांसमवेत प्रशासनाशी संपर्क साधत होत्या तर पनवेलमधील अन्य कोणाला मदत लागल्यास सहकार्य करत होत्या. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पहलगाम या ठिकाणी काही पर्यटक अडकले आहेत. त्याबाबत माहिती मिळण्यासाठी आणि पर्यटकांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी श्रीनगर येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अमरनाथ यात्रेत पनवेल आणि रायगड जिल्ह्यातूनही काही पर्यटक गेले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी श्रीनगर येथील ०१९४- २४६३६५१ / २४५७५४३/ २४८३६५१ किंवा ७७८०८०५१४४ / ७७८०९३८३९७ / ७००६०५८६२३ या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा असा आवाहन शासना तर्फे करण्यात आले आहे.