नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावात ग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा.

झुंजार टाईम्स
रविंद्र मालुसरे:- मुंबई प्रतिनिधी
सुभेदार नरवीर तान्हाजी आणि सूर्याजी मालुसरे यांच्या साखर गावाचे ग्रामदैवत आई नवलाई-भैरी यांची पुनः प्राणप्रतिष्ठा ( जीर्णोद्धार ) आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा दिनांक २४ व २५ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण दोन दिवस धार्मिक आणि पारंपरिक रितिरिवाज पूर्ण करून पोलादपूर तालुक्यात संपन्न होत असल्याचे अध्यक्ष विनायकदादा मालुसरे आणि संतोष महादेव मालुसरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितले आहे.
सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे पराक्रमी बंधू नरवीर सूर्याजी मालुसरे यांची चिरनिद्रा घेणारी समाधी आणि त्यावेळी त्यांची सौभाग्यवती सती गेल्या त्यांची सतीशिळा साखर गावात आहे. ८ वाड्यांची अशी पार्श्वभूमी असलेले साखर गाव पोलादपूर तालुक्यातील कामथी नदी, ढवळी नदी आणि महाबळेश्वरातून उगम पावलेल्या सावित्री नदी या तीन नद्यांच्या तिरावर वसलेले एक मोठे सुंदर गाव. गावाला फार पूर्वीपासून ऐत्याहासिक, सामाजिक, राजकीय, पारमार्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे.
दिनांक २३ एप्रिल २०२५ सकाळी ७ वाजता नवीन मूर्तीचे आगमन त्यानंतर गाव प्रदक्षिणा करीत टाळ-मृदंग, सनई-चौघडा, लेझीम, ढोल ताशा यांच्या गजरात शोभायात्रा. २४ एप्रिल २०२५ सकाळी १० ते दुपारी २ वा. पर्यंत वेदशास्त्र संपन्न गुरुजी-संजय कुलकर्णी यांच्या हस्ते प्रधान संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्यहवाचन, मुख्य देवता स्थापना, नवग्रह स्थापना, वास्तूप्रसाद होमहवन, मूर्तीचे अग्नुतारण, जलाधिवास, धान्याधिवास प्रधान हवन, मूर्तीचा पिंडिकान्यास, होमहवन होणार आहे.
२५ एप्रिल २०२५ सकाळी ८ वाजता मुख्यदेवता आई नवलाई आणि जोगेश्वरी, वाघजाई, भैरी, बापदेव, महादेव, जननी, सालूबाई, कालभैरी या मूर्तीची स्वानंद सुखनिवासी प. पू. गुरुवर्य अरविंद नाथ महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा कलशारोहन – परमपूज्य योगीराज ब्रह्मचारी ह. भ. प. एकनाथ महाराज लाखे होणार आहे. दुपारी १ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हलगीवादक राजू आवळे पथक यांचे हलगी वादन. संध्याकाळी ५ ते ६ वा. साखर गावातील वारकऱ्यांचे सामुदायिक भजन, गावातील महिलांचा हरिपाठ तर आळंदी येथील ह. भ. प.एकनाथ लाखे महाराज रात्रौ ९ ते ११ वाजता कीर्तन होणार आहे.
रात्रौ १२ नंतर जेजुरी येथील जागरण गोंधळ पोलादपूर तालुक्यातील समाजातील सर्व समाजधुरीण, सगे सोयरे, आप्त, इष्टमित्र परिवाराने अत्यानंदाने या धार्मिक कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भरत चिमाजी चोरगे (उपाध्यक्ष), बाजीराव विठोबा मालुसरे (सचिव), सखाराम रामचंद्र बांद्रे (खजिनदार) दीपेश परशुराम मालुसरे (कार्याध्यक्ष) यांनी केले आहे.