
झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- मुंबई प्रतिनिधी
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णअध्याय आज संपला आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे आज सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या त्यांच्या चित्रपटांमुळे ते ‘भारत कुमार’ या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मनोज कुमार यांच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी शोक व्यक्त करत म्हटले की, “महान दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आणि भारतीय सिनेमाचा ‘सिंघम’ आज आपल्यात राहिला नाही. हे चित्रपटसृष्टीसाठी मोठे नुकसान आहे.”
मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होते. त्यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी एबटाबाद येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले आणि दिल्लीत स्थायिक झाले. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या मनोज कुमार यांना अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांच्या अभिनयाने प्रेरणा मिळाली आणि त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल टाकले.
१९५७ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. १९६० मध्ये ‘कांच की गुड़िया’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’, ‘संन्यासी’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी ‘भारत’ ही व्यक्तिरेखा साकारल्याने त्यांना ‘भारत कुमार’ ही ओळख मिळाली.
त्यांच्या देशभक्तीपर भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले. ‘उपकार’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी सामाजिक, राजकीय आणि देशभक्तीची मूल्ये आपल्या चित्रपटांमधून प्रभावीपणे मांडली. त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले.
आज त्यांच्या निधनाने केवळ एक अभिनेता गेला नाही, तर एक विचार, एक देशभक्त मन हरपले आहे. त्यांच्या आठवणी चित्रपटांच्या माध्यमातून सदैव जिवंत राहतील.