
दैनिक झुंजार टाईम्स
संपादकिय
राजकारणातील “दादा माणूस” आज आपल्यातून गेला…
राजकारण म्हणजे फक्त सत्ता, पदं आणि आकडे नाहीत —
राजकारण म्हणजे माणसं, नाती, विचार आणि धाडस. आणि या सगळ्यांचं चालतं-बोलतं प्रतीक म्हणजे अजितदादा होते. शिस्त, परखडपणा, निर्भीड मत मांडण्याची हिंमत आणि निर्णय घेताना कुणाचाही विचार न करता फक्त राज्याच्या हिताचा विचार करणारा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला… हे स्वीकारणं फार अवघड आहे. ते जरी वेगळ्या पक्षात असले, तरी सर्व पक्षांना हवेहवेसे वाटणारे, आपल्यातले, आपलेसे वाटणारे नेते होते. म्हणूनच ते फक्त एका पक्षाचे नव्हते —
ते सगळ्यांचेच “दादा” होते.
गोपीनाथरावजी मुंडे, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या रांगेत उभं राहणारं हे व्यक्तिमत्त्व आज इतिहासात जमा झालं… पण मनात, आठवणीत, विचारांत कधीच न मिटणारी पोकळी निर्माण करून गेलं. दादा रागावायचे, ओरडायचे, पण आतून माया असलेला माणूस होते. समोरच्याला झापायचे, पण वेळ आली की पाठीशी उभं राहणारे होते. म्हणूनच त्यांच्या जाण्याने राजकारण थोडं अधिक पोकळ झालंय… आज ही पोस्ट लिहिताना शब्द अपुरे पडतायत, आणि डोळे नकळत ओलावतात… कारण असे नेते वारंवार जन्माला येत नाहीत.
भावपूर्ण श्रद्धांजली दादा…
तुमची उणीव कायम बोचत राहील. पण तुमचं काम, तुमचा परखड विचार आणि “दादा” म्हणून अनेकांना असलेला आधार कधीच विसरला जाणार नाही.

