डॉ.बाबासाहेब आंबेडकर नामफलक शीला रोपण नूतनीकरणाचा कार्यक्रम जल्लोषात साजरा.
शौर्य दिनी जय भीम! जय भीम! च्या गजरात परिसर दणाणला!

दैनिक झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- प्रतिनिधी
दिनांक:- ०२-०१-२०२६
पारनेर:- नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पारनेर एस टी डेपो समोरील मुख्य चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचे नाम फलकाचे शीला रोपण नूतनीकरण तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
साऱ्या जगात २०२५ ला निरोप देताना २०२६ या नवीन वर्षाचे जंगी स्वागत मोठ्या हर्षोल्हासात करण्यात आले. कुठे ढोल – ताशा, कुठे डिजेच्या तालावर बाल – बच्चे, तरुणांसकट वयोवृद्धांनी फटाक्याच्या रोषणाईत नव्या वर्षात आनंदात पदार्पण केले. एकमेकांना गोडधोड देत नव्या वर्षाचे नवे संकल्प घेत आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली.
अशा आनंदाच्या दिवशी वर्षाच्या पहिल्या तारखेला तालुक्यातील आंबेडकरी विचारधारेच्या कार्यकर्त्यां, महिला बालकल्याण समिती नगर पंचायत पारनेर सभापती कु. हिमानी रामजी तथा बाळासाहेब नगरे यांच्या प्रयत्नातून पारनेर एस. टी. डेपो समोरील मुख्य चौकात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नामफलक शीला रोपणाचे नूतनीकरण करण्यात आले. यावेळी शंकरराव नगरे, बाळासाहेब नगरे, सचिन नगरे, सिताराम लव्हांडे, सुनील शिंदे, अमित जाधव, संपत पवार, किरण सोनवणे, गिरीश साळवे यांसह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चिंचोली गावचे माजी सरपंच सतीश पिंपरकर यांनी हजेरी लावली. गौरव उघडे, रोहित लव्हांडे, यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅलीने बहुसंख्य कार्यकर्ते सामील झाले. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. शौर्य दिनाचे औचित्य साधत यशस्वीपणे पार पडलेल्या कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक होत आहे. या कार्यक्रमामुळे आंबेडकरी समाजात आनंदाचे वातावरण असून नव्या वर्षाची सुरुवात द्विगुणित झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.




