
दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पनवेल वार्ताहर
दिनांक:- ०४-०१-२०२६
पनवेल : ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता प्रतापभाई आरेकर यांचे दीर्घ आजाराने गुरुवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी पनवेल येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता व सामाजिक चळवळीतील एक आक्रमक व संवेदनशील नेतृत्व हरपले आहे.
प्रतापभाई आरेकर हे पत्रकार रक्षक दल व राष्ट्र शक्ती या संघटनांचे पदाधिकारी होते. आयुष्यभर विविध चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक धारावी येथून लढविली होती. धारावी, माटुंगा, सायन व चुनाभट्टी हा त्यांचा कार्यक्षेत्रातील बालेकिल्ला मानला जात असे.
ते जनकल्याण सहकारी बँकमध्ये सेवा बजावून अलीकडेच सेवानिवृत्त झाले होते. सेवाकाळात त्यांनी युनियन च्या कामकाजातही सक्रिय भूमिका बजावली. पनवेल येथील सुकापूर-पनवेल विभागात ते विशेष परिचित व लोकप्रिय होते.
अत्यंत प्रतिभावान व आक्रमक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व माजी आमदार संदेश कोंडविलकर यांचे ते विश्वासू सहकारी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुंबई भाजप व युवा मोर्चाचे प्रभावी व दिमाखदार कामकाज केले. नवी मुंबई–पनवेल समाज समता संघाच्या वतीने आयोजित प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.
ज्येष्ठ पत्रकार दिवंगत जयवंत लक्ष्मण जाधव यांनी उभ्या केलेल्या भारतीय पत्रकार रक्षक दलच्या माध्यमातून पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी विविध प्रश्नांवर सातत्याने लढा दिला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व जावई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.




