करुणेचा १०० किलोमीटरचा प्रवास: वाड्यात मन राज प्रतिष्ठानचे ४३८ वे मोफत वैद्यकीय शिबिर.

दैनिक झुंजार टाईम्स.
महेंद्र माघाडे. वार्ताहर.
दिनांक:- ०५-०१-२०२६
वाडा (पालघर) :- दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने मन राज प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईहून सुमारे १०० किलोमीटरचा प्रवास करून वाडा तालुक्यातील वसुरी बुद्रुक, घोडमाळ येथे ४३८ वे मोफत वैद्यकीय शिबिर यशस्वीपणे पार पडले. शिवा फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अवघड भौगोलिक परिस्थिती आणि मर्यादित साधनसामग्री असूनही या शिबिरात एकूण २९१ आदिवासी रुग्णांची तपासणी व निदान करून मोफत औषधोपचार करण्यात आले. नियमित आरोग्यसेवेपासून वंचित असलेल्या अनेक कुटुंबांसाठी हे शिबिर मोठा आधार ठरले.
शिबिरातील विशेष उपक्रमांतर्गत २११ आदिवासी नागरिकांची नेत्रतपासणी करून त्यांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले. यामुळे अनेक वृद्ध नागरिकांना पुन्हा स्पष्ट दृष्टी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
मंरज प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकीतून दर आठवड्याला सातत्याने मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करत असून, आरोग्यसेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे.
या शिबिराला शिवा फाउंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम शर्मा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच जालिंदर साळवी, विद्यानंद यादव, डॉ. नेहा यादव, हिरण पंचाल पती पत्नी, नितेश प्रेमानी आणि स्थानिक प्रतिनिधी निलेश शिंदे यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे सेवाभावी कार्य यशस्वी झाले.
शिबिराचा तपशील :
शिबिर क्रमांक : ४३८
स्थळ : वसुरी बुद्रुक, घोडमाळ, ता. वाडा, जि. पालघर
तपासणी केलेले रुग्ण : २९१
वितरित मोफत चष्मे : २११



