नेरूळच्या आर्याचा किक बॉक्सिंगमध्ये सोनेरी घाव!
राज्यस्तरावर दणदणीत विजय, थेट राष्ट्रीय स्पर्धेत झेप.

दैनिक झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- नवी मुंबई प्रतिनिधी
दिनांक:- २३-०१-२०२६
नवी मुंबई: नेरूळकर कन्येने किक बॉक्सिंगच्या रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नवी मुंबई पालिकेच्या सीवूड येथील सीबीएसई शाळेत शिक्षण घेत असलेल्या आर्या सचिन माने हिने राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकावर ठसा उमटवत आपल्या लढवय्या शैलीची झलक दाखवली आहे.
क्रीडा व युवक संचलनालय, पुणे (महाराष्ट्र राज्य) व जिल्हा क्रीडा कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ जानेवारी २०२५ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात व २४ किलोखालील वजन गटात आर्याने प्रतिस्पर्धींना संधी न देता सुवर्णपदकावर नाव कोरले.
या दणदणीत यशामुळे आर्याची राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी थेट निवड झाली असून नेरूळसह संपूर्ण नवी मुंबईतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई हाडोळे यांनी आर्याची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला. यावेळी त्यांनी आर्याला मोलाचा कानमंत्र देत, “अशीच जिद्द, मेहनत आणि चिकाटी ठेव. आई-वडिलांचे नाव उज्वल करत देशासाठी खेळ,” अशा शब्दांत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अल्पवयात मिळवलेले हे यश केवळ पदकापुरते मर्यादित नसून, आर्याच्या अंगी असलेल्या आक्रमक खेळाडू वृत्तीचे आणि उज्ज्वल भविष्याचे संकेत देणारे आहे. नेरूळची ही कन्या आता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून तिच्या पुढील झेपेकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
नेरूळची आर्या – आता थांबणार नाही, थेट राष्ट्रीय रिंगमध्ये धडक!




