
दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- २७-०१-२०२६
अहमदपूर(लातूर):- जिल्हा परिषद प्रशाला मुलांची अहमदपूर येथे नगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या प्रतिनिधी सोनम सरवदे यांनी विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगितले.
यावेळी त्यांनी कचऱ्याचे चार प्रकार, कोणता कचरा कोणत्या रंगाच्या डस्टबीनमध्ये साठवावा, ओला कचरा, सुका कचरा, घातक व पुनर्वापरयोग्य कचरा याबाबत सविस्तर माहिती दिली. दृकश्राव्य साधनांचा वापर करून मनोरंजक असे सोप्या भाषेत सोनम सरवदे यांनी मार्गदर्शन केले.तसेच “आपले खरे हिरो” या संकल्पनेतून पहिले शिक्षक, दुसरे आई-वडील, तिसरे डॉक्टर, चौथे सैनिक आणि पाचवे स्वच्छता कर्मचारी असल्याचे सांगून सफाई कामगारांचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले. स्वच्छतेमुळे आरोग्य, पर्यावरण आणि समाज कसा सुरक्षित राहतो याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांना पाच प्रश्न विचारून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.तसेच सोनम सरवदे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ पण दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माधव गुंडरे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून सोनम सरवदे उपस्थित होत्या. यावेळी शिक्षक मोहन पाटील, पांडुरंग उगीले, निर्मला नागरगोजे, प्रियांका थोरात, शाळेचे नोडल अधिकारी नागनाथ कदम, तसेच अशोक थोरात, संतोष मस्के आदी उपस्थित होते.
नोडल अधिकारी नागनाथ कदम यांनी नगरपालिकेच्या प्रशासनाचे आभार मानत, सोनम सरवदे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी शाळेत कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक माधव गुंडरे यांनी नगरपालिकेने शाळा स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली असून कचरा व्यवस्थापनाची सवय लावण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



