
दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक :- २६-०१-२०२६

अहमदपूर(लातूर):- जिल्हा परिषद प्रशाला मुलांची अहमदपूर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ७.४० वाजता मुख्याध्यापक माधव गुंडरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गीत-नृत्य तसेच संगीत कवायत यांचा उत्कृष्ट सराव केल्याने कार्यक्रम अत्यंत प्रभावी ठरला. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वेशभूषा तसेच साडी परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. राष्ट्रगीतासाठी विशेष चमु तयार करण्यात आला होता. या चमुने ध्वजारोहणाच्या वेळी ध्वजातील तिन्ही रंगांप्रमाणे वेशभूषा परिधान करून जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्रशाला(मुलांची), बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय व पंचायत समिती अहमदपूर येथे नागनाथ कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रगीताचे गायन केले.
तसेच पांडुरंग उगिले यांच्या नेतृत्वाखाली एका चमुने नगरपरिषद अहमदपूर येथे ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित राहून राष्ट्रगीत सादर केले.हायस्कूलच्या मोहन पाटील , अशोक थोरात व संतोष मस्के यांनी ध्वजारोहणासाठी उत्कृष्ट तयारी केली होती. तसेच निर्मला नागरगोजे व प्रियांका थोरात यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातील गीतांची सखोल तयारी करून घेतल्याने विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि उत्कृष्ट सादरीकरण केले.
या कार्यक्रमास शाळेतील सुमारे ९५ टक्के विद्यार्थी गणवेशात उपस्थित राहिले, हे विशेष उल्लेखनीय ठरले. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त व देशप्रेम पाहून उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले.
या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सहभागाबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.




