
दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- १६-०१-२०२६
लातूर:- जिल्हा परिषद प्रशाला मुलांची, अहमदपूर येथे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअर घडणीसाठी करिअर कोर्सेस व व्यवसायाच्या विविध संधी या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रा.डॉ.बाबुराव उगिले आणि प्रा.रत्नाकर मुंगल कस्तुरबा गांधी ज्युनिअर कॉलेज अहमदपूर यांनी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. उगिले यांनी दहावी-बारावीनंतर उपलब्ध असलेले विविध करिअर कोर्सेस, व्यावसायिक शिक्षणाच्या संधी, कौशल्याधारित अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा तसेच स्वयंरोजगाराच्या संधी यांची माहिती दिली.तसेच कस्तुरबा गांधी ज्युनिअर कॉलेज मध्ये उपलब्ध विविध कोर्सेस आणि विद्या शाखांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार करिअर निवडावे, तसेच बदलत्या काळानुसार कौशल्य विकासाला महत्त्व द्यावे, असे त्यांनी सांगितले. मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना योग्य दिशा दिली. स्पर्धा विद्यार्थ्यांच्या इच्छाशक्तीने आणि मनातून लागली पाहिजे याकरिता गोष्टीरूपाने सरांनी समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माधव गुंडरे उपस्थित होते. त्यांनी अशा मार्गदर्शन कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यातील करिअरविषयी स्पष्टता येते, असे मत व्यक्त केले. तसेच प्रा. डॉ .उगिले हे माझे गुरू आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी घडलो असे सांगितले. प्रा. डॉ .उगिले हे या जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने अत्यंत मन भरून आले असे उद्गार काढले. सूत्रसंचलन उपमुख्याध्यापक नागनाथ कदम यांनी केले. तसेच व्यवसाय शिक्षक अशोक थोरात,प्रा. रत्नाकर मुंगल आणि सौरभ उगिले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रियांका थोरात आणि शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कस्तुरबा गांधी ज्युनिअर कॉलेजतर्फे घेतलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर करून सूरज ढवळे-प्रथम, शिवानी वाघमारे -द्वितीय आणि मोहिनी तरडे-तृतीय यांना बक्षीस देऊन सहभागी सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.




