
दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे, वार्ताहर
पनवेल :- केसीसी समर कप २०२५ क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्मॅशर्स ११ (उलवे) संघाने वायएमसीए (बेलापूर) संघावर मात करत विजेतेपद पटकावले. रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी टेभोंडे गावातील मैदानावर हा थरारक सामना पार पडला.
स्पर्धेत यापूर्वी दोन्ही संघांनी पाचपैकी चार सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात स्मॅशर्स ११ चा कर्णधार अक्षय माघाडे याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. संघाच्या उत्कृष्ट गोलंदाजी व चोख क्षेत्ररक्षणाच्या जोरावर वायएमसीए संघाला १४४ धावांत रोखण्यात यश आले.
सामन्यात कर्णधार अक्षय माघाडे याने घेतलेला शानदार झेल, तसेच सैफ खान याने वायएमसीएच्या कर्णधाराचा घेतलेला चपळ झेल प्रेक्षकांचे लक्ष वेधून गेला. मनोहर पाटील, सागर शर्मा आणि अभिजित पांचाळ यांच्या अचूक स्पिन गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणले.
१४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रणित कोळवणकरने २७ धावांचे योगदान दिले, तर उपकर्णधार अभिजित पांचाळ याने २९ धावा नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
संपूर्ण स्पर्धेत कर्णधार अक्षय माघाडे याने उत्कृष्ट नेतृत्व करत ७ फलंदाज बाद केले. ‘कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट’ हे विधान त्याने कृतीतून सिद्ध केले. व्यवसाय सांभाळत क्रिकेटची आवड जोपासणारा अक्षय माघाडे हा आउटस्विंग व इनस्विंगमध्ये निपुण असा अष्टपैलू खेळाडू असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.



