अपघात
खाजगी लक्झरी बसचा शिरढोण ब्रिजवर अपघात; चालकासह प्रवासी किरकोळ जखमी.

दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे, नवी मुंबई वार्ताहर
पनवेल :- मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास विरारहून कोकणातील राजापूरकडे जाणाऱ्या ‘आर्या दुर्गा’ या खाजगी लक्झरी बसचा शिरढोण ब्रिजवर अपघात झाला. आयवा डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात घडला.
बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर बस मुलुंड येथून प्रवासी घेऊन विरारमार्गे राजापूरकडे जात होती. शिरढोण ब्रिजवर डंपरला ओव्हरटेक करत असताना बसची धडक डंपरला बसली आणि त्यानंतर बस डिव्हायडरवर आदळली. या अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातात बसचा चालक जखमी झाला असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.




