
दैनिक झुंजार टाईम्स
मुंबई प्रतिनिधी:- (किशोर सूर्यवंशी)
मुंबई,दि.१८_ मुंबईत आज सकाळी मराठी शाळा वाचविण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु मुंबई पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारल्यामुळे मोर्चेकरी हुतात्मा चौकात जमा झाले.
मुंबई आणि राज्यातील मराठी शाळा वाचविण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र आणि मराठी शाळा कृती समितीच्या वतीने हुतात्मा चौक महानगरपालिका मुख्यालयापर्यंत मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. विविधता पक्ष, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते सकाळी हळूहळू हुतात्मा चौक येथे जमू लागले.
पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारलयामुळे हुतात्मा चौकात जमाव बंदीचे आदेश असल्याचे माहिती आंदोलकांना दिली. आंदोलकांकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन करण्यात आले. आंदोलकांनी जय जय महाराष्ट्र माझा… हे गीत गायले आणि मुंबई महानगरपालिकेच्या दिशेने रवाना झाले.
यावेळी मराठी शाळा केंद्राचे दीपक पवार यांनी सांगितले की, मराठी भाषा आणि मराठी शाळा वाचवणे हे आपले सांस्कृतीक जवाबदारी आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मराठी शाळेचा मुद्दा मराठी माणसाने केंद्रस्थानी ठेवावा. अभिनेत्री चिन्मई सुमीत यांनी बंद पडत चाललेल्या मराठी शाळेबद्दल तळमळीने चिंता आणि नाराजी व्यक्त केली.
यावेळी कॉ. प्रकाश रेड्डी, मा. खासदार भालचंद्र मुणगेकर, कामगार नेते सिताराम लव्हांडे विविध पक्ष, संघटना, चळवळीतील शेकडो कार्यकर्ते मोर्च्यात सामील झाले होते.



