जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एकल महिलांची स्वतंत्र नोंदणी करा – एकल महिला संघटनेची मागणी.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- २३-१२-२०२५

लातूर:- प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एकल महिलांची स्वतंत्र नोंदणी करून त्यांना अधिकृत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी एकल महिला संघटना व कोरो इंडिया, मुंबई यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना निवेदन देण्यात आले आहे.
कोरो इंडिया, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने महिला नेतृत्व विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एकल महिला संघटना मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातही महिला नेतृत्व विकासाचे काम सुरू आहे.
या कामादरम्यान असे निदर्शनास आले आहे की, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, पतीपासून विभक्त तसेच अविवाहित अशा एकल महिलांकडे एकल असल्याचा कोणताही अधिकृत शासकीय पुरावा उपलब्ध नाही. कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये एकल महिलांची स्वतंत्र नोंदणी होत नसल्यामुळे अशा महिला व त्यांची मुले बाल संगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना यासह विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत.
तसेच न्यायालयीन प्रकरणांमध्ये एकल असल्याचे सिद्ध करताना तसेच पतीच्या संपत्तीतील कायदेशीर हक्क मिळविताना या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकल महिलांची ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र नोंदणी होऊन ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीचे अधिकृत प्रमाणपत्र मिळाल्यास त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण होईल व त्यांना शासकीय योजनांचा तसेच कायदेशीर हक्कांचा लाभ मिळण्यास मदत होईल, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
त्यामुळे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यासह सर्व ग्रामपंचायतींमध्ये तात्काळ एकल महिलांची स्वतंत्र नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था लागू करावी, अशी ठाम मागणी एकल महिला संघटना व कोरो इंडिया, मुंबई यांच्या वतीने करण्यात आली आहे.हजरतबी शेख,आम्रपाली तिगोटे,आशा बाबन्ने,कौशल्या मुंढे,शितल कदम,वर्षा शिंदे,पुजा टमके,भाग्यश्री रणदिवे यांची उपस्थिती होती




