सावली सहयोग संस्थेच्या उपक्रमाने १०१ दिव्यांग बांधवांसाठी एक दिवा दिव्यांगांसाठी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी चा पसरला स्नेहाचा उजेड !

दैनिक झुंजार टाईम्स
मुंबई प्रतिनिधी: नानासाहेब डी. खैरे
दिनांक:- १८-११-२०२५
प्रभादेवी – दीपावलीच्या आनंदोत्सवात समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने सावली सहयोग संस्थेने यावर्षीही ‘एक दिवा दिव्यांगांसाठी’ हा उपक्रम उत्साहात साजरा केला. संस्थेच्या वार्षिक परंपरेचा भाग असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन १५ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी सहा वाजता समता मित्र मंडळ, एडणवाल चाळ, जगन्नाथ भातणकर मार्ग, प्रभादेवी येथील स्वामी समर्थ मठासमोर करण्यात आले.
या विशेष उपक्रमात प्रभादेवी–दादर विभागातील एकूण १०१ दिव्यांग बांधवांना दीपावलीचे औचित्य साधून घड्याळ आणि डबा या भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. दिव्यांग व्यक्तींच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या आनंदासाठी वर्षानुवर्षे सातत्याने उपक्रम राबविणारी सावली सहयोग संस्था यंदाही मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनासह पुढे सरसावली.
कार्यक्रमाची सर्व व्यवस्था संस्थेच्या खजिनदार पूजा सावंत यांनी सांभाळली. प्रमुख आयोजन संस्थेचे अध्यक्ष आयु. राजेश घोलप आणि सचिव आयु. अनिल घोडके यांनी केले. दिव्यांग बांधवांना प्रोत्साहन, सहकार्य आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम यावर्षीही स्थानिक पातळीवर व्यापक उपस्थिती आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अधिक भव्य झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननिय, लाडके नगरसेवक मा. नाना आंबोले उपस्थित होते. तसेच युवा कामगार नेते आयु. केतन कदम, समाजभूषण पुरस्कार विजेती कल्पना जगताप, तसेच विवेक पाटील, संतोष गुरव (वार्ड अध्यक्ष, भाजपा), अभिषेक पाताडे, साईश माने (उबाठा पदाधिकारी),आणि कपिल शिरसागर. (महासचिव, वंचित) यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या पदाधिकारी व स्वयंसेवकांनी कार्यक्रमात विविध जबाबदाऱ्या पार पाडत लक्षणीय योगदान दिले. या सहकार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. राजेश घोलप यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, संस्थेचा मुख्य उद्देश समाजातील गोरगरीब, गरजू आणि वंचित घटकांसाठी सातत्याने कार्य करणे हा आहे, आणि मिळणारे सहकार्य व प्रोत्साहन हे आम्हाला अधिक उत्साहाने काम करण्यास प्रेरित करते.
या उपक्रमातील समर्पित कार्य, नियोजन आणि मानवतावादी दृष्टिकोनाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. प्रभादेवी परिसरातील सामाजिक कार्यामध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या सावली सहयोग संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सर्वांनी अशा उपक्रमांचे समाजाला लागणारे महत्त्व अधोरेखित केले. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता दीपावलीच्या प्रकाशाप्रमाणेच समतेचा, स्नेहाचा आणि सहकार्याचा हा दिवा आगामी काळातही असाच तेवत राहील, अशी भावना या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवली.




