सण उत्सव

कोप्रोली सुहास मित्र मंडळाचा २६ वा गणेशोत्सव – नवसाला पावणारा राजा भक्तांच्या सेवेत.

लालबागच्या राजाची प्रतिकृती धार्मिक-सामाजिक आणि नवसाला पावणारा राजा विशेष आकर्षण .

दैनिक झुंजार टाईम्स 

अलंकार कडू:- उरण प्रतिनिधी 

दिनांक:- १८-०९-२०२५

उरण:- रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कोप्रोली गावातील सुहास मित्र मंडळ, कोप्रोली मागील २५ वर्षांपासून कार्यरत आहे. यंदा मंडळाचे २६ वे वर्ष पूर्ण होत असून, २००० साली युवकांच्या प्रेरणेने आणि भक्तीभावनेतून या मंडळाची स्थापना करण्यात आली होती.

या वर्षीच्या उत्सवाचे वैशिष्ट्य असे की, गणेशाची आकर्षक लालबागच्या राजाची प्रतिकृती उभारण्यात आली असून, दैनंदिन पूजा-आरतीच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोहार गल्लीतील सुहास मित्र मंडळाच्या गणेश मंडपात दरवर्षीप्रमाणेच सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात भजन, कीर्तन, सांस्कृतिक नृत्य तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष करून पंचक्रोशीतील कलाकारांना मंडपात आपली कला सादर करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

मंडळामार्फत विविध सामाजिक उपक्रमही राबवले गेले असून, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण या उपक्रमांमध्ये सर्व सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

मंडळातील युवकवर्ग सजावट, शिस्त आणि उपक्रमांच्या यशस्वी आयोजनात पुढाकार घेताना दिसतो. महिला वर्गदेखील आरती, भजन, कीर्तन, स्वच्छता व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवतो. प्रत्येक कार्यक्रमात शिस्तीचे पालन व निर्दोष आयोजन होईल, याकडे मंडळाचे विशेष लक्ष असते.

नवसाला पावणाऱ्या सुहास मित्र मंडळ, कोप्रोलीच्या गणरायाला पंचक्रोशीतील नागरिक व हितचिंतक भेट देऊन, देणगी देऊन सहकार्य करत असतात. नवसाला पावणारा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गणरायाच्या चरणी भक्त आपली गाऱ्हाणी मांडतात व त्यांची पूर्तता होत असल्याने भक्तांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. नवस फेडण्यासाठी येथे मोठी गर्दी होत असते.

मंडळातील विसर्जन सोहळा हा देखील विशेष आकर्षणाचा भाग आहे. या सोहळ्यात संपूर्ण गावातील गणेशभक्त सहभागी होऊन, शिस्तीने व उत्साहाने मिरवणूक काढली जाते. कोणतेही गालबोट न लागता विसर्जन सोहळा संपन्न होतो.

दरवर्षी गणरायाचे आगमन साखर चौथीच्या दिवशी केले जाते. यावर्षी गणेशाची प्राणप्रतिष्ठा १० सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आली. तसेच विसर्जन मिरवणूक गुरुवार दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. यावर्षी मंडळाचे अध्यक्ष जीवन म्हात्रे आणि उपाध्यक्ष प्रितेश म्हात्रे असून, मंडळातील संपूर्ण युवकवर्ग एकजुटीने कार्यरत आहे.

उत्सावादरम्यान महिला व लहान मुलांसाठी विशेष खेळ आयोजन, कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा, तसेच विविध लोककला आणि लोकनृत्य सादरीकरण होते.

सुहास मित्र मंडळाच्या भावी योजनांमध्ये अधिकाधिक समाजोपयोगी कार्य व्यापक स्वरूपात राबवण्याची वचनबद्धता आहे. एकूणच, पंचक्रोशीत या नवसाला पावणाऱ्या राजाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून, गणरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे.

अशा या नवसाला पावणाऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे उरण तालुका संघटक अलंकार कडू व नरेन म्हात्रे यांची विशेष उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button