महाराष्ट्र ग्रामीण

5%दिव्यांग निधी वाटप नाही झाल्यास भीक मागो आंदोलनाचा निर्धार. – रमाकांत आरनुरे

दैनिक झुंजार टाईम्स 

राम रत्नपारखे:- लातुर जिल्हा प्रतिनिधी

दिनांक:- ०३-०९-२०२५

लातूर:- दिव्यांगांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि पंचायत समितीच्या वार्षिक उत्पन्नाच्या 5 टक्के निधी राखून ठेवण्यात यावा असे शासन निर्णयाद्वारे घोषित केले आहे. परंतु तसा राखीव निधी ठेवून त्यातून दिव्यांगांना प्रत्यक्ष कोणत्याही योजनेचा लाभ दिला जात नसल्याचे दिव्यांगांचे म्हणने आहे. याची दखल घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत अहमदपूरचे शहराध्यक्ष रमाकांत आरनुरे यांनी पंचायत समिती अहमदपूरचे गटविकास अधिकारी पंकज शेळके  यांना निवेदन देऊन दिव्यांगासाठी पंचायत समिती आणि अधिनस्त प्रत्येक ग्रामपंचायतीला सदर शासन निर्णयानुसार योजना राबविण्यात याव्यात अशी विनंती केली होती. याची दखल घेऊन गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना दिव्यांगांच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी व अहवाल कळवावा आणि या कामी दप्तर दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेशित केले होते. यानुसार किनगाव ग्रामसभेत 5% निधी दिव्यांगाना वाटप करावा अशी मागणी करून अखिल भारतीय ग्राहक पंचायत अहमदपूरच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परंतु इतर ९७ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दिव्यांग निधीचा विषय काढला गेला नाही आणि अद्याप गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल पण ग्रामसेवकांनी दिला नाही. गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवून दिव्यांगाचा निधी हडप करण्याचा प्रयत्न तर केला जात नाही अशी शंका येते. ग्रामपंचायत कडून सकारात्मक प्रतिसाद नाही मिळाल्यास सरपंच आणि ग्रामसेवकांना येत्या काही दिवसांत “भिक मागो आंदोलन” करून जमेल तेवढे पैसे देण्याचा दिव्यांग बांधवांनी निर्धार केला आहे.यासाठी गटविकास अधिकारी अहमदपूर यांना निवेदन देण्यासाठी दिनांक ०३/०९/२५ रोजी बुधवारी

दुपारी २:०० वाजता तालुक्यातील दिव्यांग महिला व पुरुष पंचायत समिती अहमदपूर येथे उपस्थित झाले होते. निवेदन देतेवेळी गटविकास अधिकारी पंकज शेळके यांनी सकारात्मक भुमिका घेऊन सर्व ग्रामपंचायतींना दिव्यांगाचा हक्काचा निधी वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत अहमदपूर शहराध्यक्ष रमाकांत आरनुरे यांच्या आवाहनास दिव्यांगजनांनी प्रतिसाद दिला असून दिव्यांगाना त्यांचा हक्काचा निधी मिळेपर्यंत लढा उभारला जाईल असे आरनुरे यांनी सांगितले. निवेदन देतेवेळी शहराध्यक्ष रमाकांत आरनुरे, शहर उपाध्यक्ष जयराम पोले आणि तुपकर महेश महारूद्र

गायकवाड शिवानी मोतीराम, तुपकर महारूद्र व्यंकटी, हाके गुणवंत शेषेराव, कोलंगे गोविंद रंगराव, बडगीरे किशन धोंडीराम , हाके गणेश तुकाराम, रायभोळे भगवान बलभीम, पठाण मुक्तार रहीमसाहब ,बोधनकर तिरूपती डिगांबर,सुरनर संगुबाई माणिक ,कांबळे नरसिंग संभाजी , शेख खाजा गुलाबसाब , शेख रहीम असज, पटेल एजाज पाशा,कांबळे विश्वनाथ माधव, पटेल हासिफ आदी दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button