शांतीवन येथील कुष्ठरोग निवारण समितीमध्ये गैरप्रकार!
कुष्ठरोग निवारण समिती ‘शांतीवन’मधील गैरप्रकार उघड करण्यासाठी राजू शिंदे यांचा पुढाकार, १५ ऑगस्टला लाक्षणिक उपोषण.

दैनिक झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १५-०८-२९२५
पनवेल तालुक्यातील शांतीवन येथे कार्यरत असलेल्या कुष्ठरोग निवारण समिती या संस्थेमधील विविध गैरप्रकार, आर्थिक अनियमितता आणि प्रशासकीय त्रुटी उघड करण्यासाठी संस्थेचेच सदस्य राजू गोविंदराव शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंबंधीचे अनेक अर्ज, तक्रारी आणि कागदपत्रे त्यांनी जिल्हाधिकारी, धर्मादाय आयुक्त, रायगड विभाग तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सादर केली आहेत.
राजू शिंदे यांनी मांडलेल्या तक्रारींनुसार, संस्थेमध्ये कंत्राटदारांना देयकांबाबत संशयास्पद व्यवहार, सदस्यत्वातील मताधिकार प्रक्रियेत अनियमितता, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमधील पारदर्शकतेचा अभाव, तसेच काही प्रमुख पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि न्यायालयीन खटल्यांशी संबंधित गंभीर आरोप असल्याचे दिसून आले आहे.
शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही माजी व विद्यमान पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या निधीचा गैरवापर करून ठराविक कंत्राटदारांना लाभ दिला. तसेच, संस्थेच्या कार्यकारी मंडळात आवश्यक ती कारवाई न करता विषय लांबणीवर टाकण्यात येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या पार्श्वभूमीवर, १५ ऑगस्ट २०२५ रोजी शांतीवन येथे आयोजित एकदिवसीय “लाक्षणिक उपोषण” कार्यक्रमात शिंदे आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यासाठी त्यांनी अनेक सामाजिक संस्था, पत्रकार, पर्यावरण कार्यकर्ते, शांतिवनप्रेमी आणि स्थानिक नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संस्थेतील आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेवर तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.