प्रभादेवीचे पुरातन श्री विठ्ठल मंदिर आपला अनमोल ठेवा – आमदार महेश सावंत.

दैनिक झुंजार टाईम्स
रवींद्र मालुसरे:- मुंबई प्रतिनिधी
दिनांक:- ०६-०७-२०२५
महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरु आहे. देशातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत. मध्य मुंबईच्या गिरणगावात विशेषतः प्रभादेवी येथील या श्रीविठ्ठल मंदिरात गेली १२५ वर्षे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जात आहे. बदलत्या काळासोबत मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा अस्तंगत होत आहेत. प्रभादेवीतील वाड्यावस्त्यांची मुंबई गगनभेदी होत आकाशाला भिडत चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी काही प्रभादेवीकर भाविकांनी इथली धार्मिक परंपरा अजूनही टिकून ठेवली आहे असे मनोगत आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केले.
प्रभादेवी येथील शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या श्रीविठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त आमदार महेश सावंत आणि त्यांच्या पत्नी स्मिता सावंत यांच्या शुभहस्ते महापूजा आणि अभिषेक करण्यात आली. याप्रसंगी भाविकांसमोर सावंत बोलत होते.
सावंत पुढे असेही म्हणाले की, श्री सद्गुरु भावे महाराज वारकरी समाजातील अनेक वारकरी निष्ठेने या मंदिरातील नित्य पुजापाठ आणि १०५ वर्षे चालत असलेले अखंड हरिनाम सप्ताह साजरे करीत आहेत. विशेष म्हणजे या मंदिराला येत्या श्रावणात १२५ वर्षे होत आहेत. आपण सर्वजण हा दिवस मोठया उत्साहाने साजरा करूया.
सकाळी ५ पासून प्रभादेवी पासून कोळीवाडा परिसरातील हजारो भाविकांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. खासदार वर्षाताई गायकवाड, माजी आमदार सदा सरवणकर,माजी आमदार नितीन सरदेसाई, माजी महापौर विशाखा राऊत, माजी महापौर हेमांगी वरळीकर, नगरसेवक समाधान सरवणकर, माजी नगरसेवक संतोष धुरी, शाखाप्रमुख संजय भगत, शैलेश माळी, मुंबई भाजपचे सचिव जितेंद्र राऊत, सुप्रसिद्ध उद्योजक चेतन खाटपे, महिला आघाडी प्रमुख प्रिया सरवणकर, भाजप तालुकाध्यक्षा अक्षता तेंडुलकर, दादर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड, डॉ भूषण नागवेकर या मान्यवरांनी दर्शन घेतले. समाजाचे जेष्ठ कीर्तनकार ह भ प कृष्णा मास्तर घाडगे यांच्या नेतृत्वाखाली गणेश तोडणकर, गणेश अहिरे, काशीराम कळंबे, कैलास घाडगे, सुरेश घाडगे, विष्णू सकपाळ, निलेश केसरकर, विठोबा केसरकर,हेमंत सकपाळ यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.