आयुष्य (जीवन) हा चित्रपट पुन्हा होणे नाही!

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १२-०६-२०२५
खरंतर १९५०-७० च्या दशकातील काबाडकष्ट करणारी पिढी आता नष्ट होत चालली आहे. ग्रामीण भागात पुरुषवर्ग मंदिरा शेजारी सफेद लेंगा, सफेद कुर्ता व डोक्यावर टोपी अशी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेली पिढी रोज सकाळी देवदर्शन करून बसलेली दिसत असे. याशिवाय गावाला शोभा नाही. महिलांमध्ये पहाटे ५ वाजल्यापासून स्वयंपाक, देवपूजा करून डोक्यावर पदर व कुंक लावून , मुलांना शाळेत घालवून संस्काराची, नम्रतेची, आदराची पिढी घडवली. शेती व व्यवसायाकडे पाऊल उचलले जाते व सायंकाळी काबाड कष्ट करून आल्यावर स्वयंपाक करून सुखाची झोप लागते. असा दिनक्रम ग्रामीण भागात चालत होता.
याच पिढीने देशातील स्वातंत्र्यानंतरचा काळ व संघर्ष बघितला. महापूर, वादळे, भूकंप ,दुष्काळ व देशातील १९७१ मधील भारत पाकिस्तान युद्ध बघितले आहे. पाण्यासाठी विहीर खोदून पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा संघर्ष केला व जगाचा पोशिंदा बनला.
या उलट शहरी भागामध्ये याच दशकातील पिढी सकाळी व्यायाम करून चार भिंतीच्या आत मध्ये टीव्हीवर जगात चाललेल्या घडामोडी व करमणूक कार्यक्रम पाहते.
मोबाईल मुळे मुलांना व्यसन निर्माण झाले आहे तर काही ठिकाणी शिक्षणासाठी फायदा होत आहे. युवा पिढी व्यसनाधीन बनत चालली आहे त्यामुळे आपल्या ध्येयापासून दूर भटकत चालली आहे.भविष्य अंधारात चालले आहे. व्यसनापासून दूर राहिले पाहिजे तरच आपण आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकतो.
आता १९५०-१९७० च्या दशकातील पिढीने घडवलेली संस्कारी पिढी उद्योग व नोकरीसाठी बाहेरगावी आली. आपला नीटनेटका संसार करत गावाकडच्या आपल्या आई-वडिलांना संभाळतात तर काही मंडळी संस्कारीक पिढी सध्याच्या युगात आई-वडिलांना अनाथ आश्रम व गावाकडे पाठ फिरवली आहे. आता त्यांना आपल्या आई-वडिलांनी काबाडकष्ट करून एवढ्या उंचीवर नेऊन ठेवले याची जाणीव विसरले आहेत. आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व विधीवर लाखो रुपये खर्च करतात मग पण जिवंत असताना विचारपूस का केली जात नाही ? याचीच खंत वाटते. मग आई वडिलांनी आपल्या पोटच्या गोळ्याला संस्कार द्यायला कमी पडले का? आपली शेतीवाडी विकून मुलाला शिक्षण दिले याची चूक झाली? असे अनेक प्रश्न मनात येतात.
नियतीच्या पाड्या प्रमाणे जैसे कर्म तैसे फळ भोगावे लागते.अजूनही वेळ गेलेली नाही आपल्या आई-वडिलांना, आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रपरिवार संभाळा व जिवंतपणे विचारा यातूनच माणुसकीचे दर्शन होईल हे नक्कीच.