राज्यात आज पावसाचा इशारा ! आजही सावधगिरी बाळगा.

झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०८-०६-२०२५
मे महिन्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण केली होती, परंतु नंतर पावसाचा जोर कमी झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १२ जून २०२५ नंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. मुंबई आणि पुण्यात सकाळपासून पाऊस सुरू आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आहे. यंदा मान्सून लवकर दाखल झाला, पण आता तो उत्तरेकडे सरकत आहे. कोकण, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला.
नागरिकांनी आज बाहेर पडताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. हवामान खात्याने राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.