महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई ची दाद तरी कोणाकडे मागायची?
महाराष्ट्राचे विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाने शेतकरी संतप्त

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०३-०६-२०२५
जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला अजून किती गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत.ऊन,वारा ,पाऊस या सर्व गोष्टींचा सामना करून कसाबसा शेतकरी आपले पीक रात्रंदिवस मेहनत करून दोन रुपये कमावण्याच्या तयारीत असतो. यावर शेतकऱ्याचे कुटुंब चालत असते. अशातच अवकाळी पाऊस येऊन हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. हे वर्ष वाया गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या पिकांची तयारी करतो आता तरी आपल्या शेतीमालाला भाव मिळेल या आशेने शेती करतो.
महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्याचा विडा उचलला की काय? अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. एका बाजूला अवकाळी पाऊस तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करायला गेले असताना या ठिकाणी ढेकळांची पंचनामे करायचे की काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशा प्रश्नांना शेतकरी दाद तरी कुणाकडे मागणार? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कृषी मंत्री अशी असवेदनशील भाषा वापरून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू लागले आहेत. किमान भाषा तरी व्यवस्थित वापरायला पाहिजे. सांत्वन करायचे सोडून शेतकऱ्यांनाच जाब विचारला जात आहे. असेच कृषिमंत्री महाराष्ट्राला हवे आहेत काय?
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना व शेतकरी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे कृषिमंत्री यांचा निषेध केला जातोय. अजूनही सरकारच्या मंत्र्यांना जाग येत नसेल तर यापुढे शेतकरी संघटना व शेतकरी अशा मंत्र्यांना योग्य धडा शिकवतील हे नक्कीच!