महाराष्ट्र दिनाचा इतिहास!

झुंजार टाईम्स
पनवेल प्रतिनिधी:- कांतीलाल पाटील
फ्लोरा फाउंटन, मुंबई : ०१ मे २०२५
१९५० च्या दशकात भाषावार राज्यांच्या निर्मितीसाठी आंदोलनं जोर धरू लागली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं. गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली. मात्र मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा की नाही, यावरून मोठा वाद निर्माण झाला.
२१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईच्या फ्लोरा फाउंटन परिसरात हजारो आंदोलकांनी एकत्र येत सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शने केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर पोलिसांनी लाठीचार्ज आणि नंतर गोळीबार केला. या घटनेत १०६ आंदोलकांना आपले प्राण गमवावे लागले. हे हुतात्मे आजही महाराष्ट्राच्या मनामनात जिवंत आहेत. त्यांच्या बलिदानामुळेच शेवटी केंद्र सरकारने नमते घेतलं आणि ०१ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.