आत्महत्या -खुन

मुलानं केला आईचा खून;

माशाची भाजी कुत्र्याने खाल्ल्यानं चिडून मुलानं केला आईचा खून. पोलिसांनी चार तासात आरोपीला अटक केली.

झुंजार टाईम्स 

राजपाल शेगोकार:- धुळे प्रतिनिधी 

दिनांक:- २६-०५-२०२५

धुळे जिल्ह्यातील ताजपुरी शिवारात रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. माशाची भाजी कुत्र्याने खाल्ल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून मुलाने स्वतःच्या आईचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला. थाळनेर पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपीला अटक केली आहे.मयत टापीबाई रेबला पावरा (वय ६७, रा. खैरखुटी, ह.मु. ताजपुरी) या आपल्या मुलासोबत देवीसिंग भिलेसिंग चौधरी यांच्या शेतातील गोठ्यात वास्तव्यास होत्या. २४ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी जेवणासाठी माशाची भाजी बनवली होती. ती भाजी कुत्र्याने खाल्ल्याने मुलगा आवलेस रेबला पावरा (वय २५) संतापला व आईशी वाद घालून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यात टापीबाई यांचा जागीच मृत्यू झाला.हा संपूर्ण प्रकार मयत महिलेचा नातू निखील (वय ११) याने पाहिला. त्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर थाळनेर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. पोलिसांनी चार पथकं तयार करून विविध भागात शोधमोहीम सुरू केली.अखेर, आवलेस पावरा हा आढे शिवारातील उदवंत सोनार यांच्या केळीच्या शेतात लपलेला आढळला. पोलिसांनी चारही बाजूंनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.मयत टापीबाई यांच्या जावयाच्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास थाळनेर पोलीस स्वतः करत आहेत.सदर कारवाई पो.अ. श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक), किशोर काळे (अप्पर पोलीस अधीक्षक), सुनील गोसावी (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शत्रुघ्न पाटील, पोसई समाधान भाटेवाल, पोहेकॉ संजय धनगर, भूषण रामोळे, पोकों उमाकांत वाघ, किरण सोनवणे, योगेश पारधी, रामकृष्ण बोरसे, रणजीत देशमुख, मुकेश पवार, आकाश साळुंखे, होमगार्ड मनोज कोळी, राजू पावरा यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button