हवामान

या वर्षी मान्सून वेळेआधीच दाखल होणार!

महाराष्ट्रात मान्सून लवकर दाखल होणार असून जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पोहोचण्याची ९३.८% शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि मुंबईकरांना उकाड्यातून सुटका होईल.

झुंजार टाईम्स 

राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी 

दिनांक:- ३०-०४-२०२५

उकाड्याने हैराण झालेल्या आणि पाण्याचा प्रश्न समोर असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात मान्सून लवकर दाखल होणार आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून दाखल होईल. दरवर्षीपेक्षा यंदा एक आठवडा मान्सून लवकर येईल असा अंदाज आहे. मान्सूनच्या वाटेत सध्या कोणताही अडथळा नाहीय, त्यामुळे यंदा मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता आहे.

नैऋत्य मोसमी पावसाचे यंदा सामान्य वेळेपेक्षा सुमारे एक आठवडा आधीच भारतात आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. केरळमध्ये येत्या २–३ आठवड्यांत मान्सून दाखल होऊ शकतो आणि त्यानंतर मुंबईकडे वेगाने सरकण्याची चिन्हं आहेत. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नव्या मॉडेल्सनुसार, जून २०२५ च्या पहिल्या आठवड्यात मान्सून मुंबई गाठण्याची शक्यता ९३.८ टक्के आहे. त्यामुळे मे अखेरीस उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना लवकरच गारवा मिळण्याची शक्यता आहे.

मान्सून वेळेआधी दाखल झाल्यास खरीप पिकांच्या पेरणीसाठी अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण होईल. शेतकरी वेळेवर शेतीची कामं सुरू करू शकतील आणि जलसाठ्यांमध्येही पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. याचा थेट परिणाम उत्पादनक्षमता आणि उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या शक्यतेमुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जोरदार वाऱ्यांबरोबरच विजांसह पावसाचे अंदाज लक्षात घेता, सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य तयारी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button