श्री ज्योतिर्लिंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं आयुर्वेदिक वृक्षांचे प्रदर्शन!
श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती येथे आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचे व वृक्षांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड(जिंती) प्रतिनिधी
श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती या विद्यालयात औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती आणि आजारावर घरगुती उपचारांचे पदार्थ याचे प्रदर्शन शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी भरविण्यात आले.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे आरोग्य विभागा अंतर्गत महाराष्ट्रातल्या काही निवडक शाळांची निवड घरगुती आयुर्वेदिक उपचार व जीवन पद्धती या प्रशिक्षणासाठी केली होती. ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन जिंतीचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब पाटील यांच्या सहकार्याने श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती या विद्यालयाची ही या उपक्रमासाठी निवड झाली होती आणि सदरच्या प्रशिक्षणासाठी विद्यालयातील जेष्ठ विज्ञान विषय उपशिक्षिका वनिता कुंभार यांची निवड करण्यात आली होती.
प्रशिक्षणानंतर मॅडमनी जिंती, अकाईवाडी, महारुगडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन व आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा सहभाग घेऊन घरगुती उपचार व आपले आरोग्य या विषयावर विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यासहित उद्बोधन घेतले. आणि त्यावर प्रदर्शन घेण्याची नियोजन केले. या त्यांच्या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घरगुती पदार्थ जसे की लिंबू, आद्रक, हळद, नाचणी, कच्ची कैरी, वेलची, लवंग, बेदाणे, काळी मिरी, दुधी भोपळा, अक्रोड, बीट, कडुलिंब यांच्यापासून गुणकारी काढा, गोळी, सुंठवडा, पन्हे, नाचणी अर्क, इत्यादी पदार्थांची पाककृती सांगून विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या आणि त्याचे प्रदर्शन भरवले, याच प्रदर्शनात वड, पिंपळ, गवती चहा, कोरफड, आवळा, चिंच, शमी, इत्यादी कुंडीतील वृक्षांची ओळख व त्यांचे उपयोगी प्रदर्शनात स्पष्ट करण्यात आले.
काही औषधी वनस्पतींची शास्त्रीय नावे, उपचार पद्धती, उपयोग अशा चित्रांची मांडणी प्रदर्शनात करण्यात आली होती. जसे की कंबरमोडी( कुडी कुडी), शतावरी, वड, पिंपळ, आवळा,इ.
प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कारंडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेल्या पदार्थांची पाहणी केली काही पदार्थांची चवही घेतली व त्यांच्या कार्याची स्तुती केली आणि प्रदर्शन खूप चांगले केल्याबद्दल पुढील कामासाठी शुभेच्छा ही दिल्या.विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन आपल्या पदार्थाचे उत्तमरीत्या सादरीकरण केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिंती, अकाईवाडी, महारुगडेवाडी या शाळांचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कोठावळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. वनिता कुंभार यांनी आपल्या प्रास्ताविकात आयुर्वेदिक उपचार पद्धतीची गरज, महत्व प्रशिक्षणातून माहिती घेतलेल्या जीवन पद्धतीचा अवलंब कसा करावा? हा उपक्रम शाळेपुरता मर्यादित न राहता, तो घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन आणि विद्यार्थी सहभाग याबाबत माहिती दिली.
जि प शाळा जिंती चे उपशिक्षक सुहास पाटील सर यांनीही विद्यार्थ्यांनी केलेल्या पदार्थांचे कौतुक करून आपल्या खानपानावर नियंत्रण ठेवून योग्य आहार कसा घ्यावा तो शरीराला कसा पोषक असतो याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी खोचरे सर, रुपाली माळी मॅडम, गणेश तपासे सर, लिपिक विजय धाईगडे सर, संदीप मोहिते दादा, यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार खोचरे सर यांनी मानले. सूत्रसंचालन रूपाली माळी यांनी केले.